इमर्जन्सी फंड तयार करा, नवे कर्ज घेऊ नका; मोठ्या आर्थिक संकटाची नांदी? प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागाराची वॉर्निंग!

मुंबई : प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

भविष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक संकटाकडे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांनी आतापासूनच कोणती आर्थिक तयारी करावी, याबाबतही त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यावर युजर्समध्ये चर्चाही सुरू झाली आहे.

मी काही नॉस्ट्राडेमस नाही

मुथुकृष्णन दंडपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ते कोणतेही भविष्य सांगणारे नॉस्ट्राडेमस नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना जाणवणाऱ्या संभाव्य परिस्थितीबाबत ते लोकांना सावध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुन्हा एकदा लोकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

दंडपाणी यांनी लिहिले की, प्रत्येकाने शक्य तितका सुरक्षित राखीव निधी किंवा इमर्जन्सी फंड तयार करण्याचा प्रयत्न करावा. हा निधी आपल्या कुटुंबाचा तब्बल तीन वर्षांचा संपूर्ण खर्च भागवू शकेल एवढा असावा, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी कर्ज घेणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः नवीन कर्ज घेऊ नका, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

इतकेच नाही तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे किंवा घर खरेदी करण्यासारख्या दीर्घकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला अडकवू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या सल्ल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.

असं नाही की आभाळ कोसळणार आहे

आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त करत असतानाच दंडपाणी यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, असेही म्हटले आहे. नोकरी आणि आपल्या भूमिकेबाबत खूप जास्त विचार करत बसण्याऐवजी सध्या उत्पन्न सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

असं नाही की आभाळ कोसळणार आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जगाने यापूर्वीही अशा आर्थिक संकटांचा सामना केला आहे आणि भविष्यातही अशा परिस्थिती येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. आधीपासून आर्थिक तयारी करून ठेवल्यास कठीण काळात व्यक्तीला आर्थिक तसेच भावनिक पातळीवर परिस्थितीचा सामना करण्यास मदत होऊ शकते. काळ बदलत असतो आणि भविष्यात पुन्हा चांगले दिवस येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दंडपाणी यांची पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर युजर्सनी त्यावर आपापली मते मांडण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी त्यांचा सल्ला योग्य आणि आवश्यक असल्याचे म्हटले. मात्र अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी तीन वर्षांचा इमर्जन्सी फंड तयार करण्याच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला.

एका युजरने लिहिले की, केवळ दोन महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार करणेही अनेकांसाठी मोठी गोष्ट असते. इमर्जन्सी फंड, आरोग्याशी संबंधित खर्च आणि इतर गरजा असताना तीन वर्षांचा खर्च भागवण्यासाठीची बचत कशी करायची, असा सवाल या युजरने केला.

दुसऱ्या एका युजरने दंडपाणी यांच्या मताशी पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले. बहुतांश लोक 1979 पासून सेन्सेक्सच्या कामगिरीचा अभ्यास करत नाहीत, असे त्याने म्हटले. अशा काळाचाही बाजाराने सामना केला आहे, जेव्हा सेन्सेक्सने सलग तीन वर्षे नकारात्मक परतावा दिला होता, असा दावा या युजरने केला.

मी माझं सोनं विकावं का?

दंडपाणी यांच्या पोस्टवर आणखी एका युजरने आपल्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘मी माझे सोने विकावे का?’ असा थेट सवाल त्याने केला.

आपण कधीही हातात रोख रक्कम ठेवण्याचा विचार केला नव्हता, मात्र दंडपाणी यांच्या पोस्टमुळे आता त्याबाबत विचार करायला भाग पाडले गेले असल्याचे या युजरने म्हटले. आर्थिक संकटाच्या शक्यतेच्या चर्चेमुळे लोक आपल्या बचत आणि मालमत्तेबाबतही विचार करू लागल्याचे या प्रतिक्रियेतून दिसून आले.

घर आणि कारसाठी कर्ज घेण्यात गैर काय?

मात्र सर्वच युजर्स दंडपाणी यांच्या सल्ल्याशी सहमत नव्हते. एका युजरने म्हटले की, काही प्रमाणात बचत असणे गरजेचे आहे. मात्र, घर किंवा कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यात त्याला काहीही गैर वाटत नाही. जर बाजारात मोठी घसरण झाली आणि आर्थिक संकट निर्माण झाले तर केंद्र सरकार किंवा अर्थ मंत्रालयाकडून संपूर्ण देशासाठी दोन-तीन वर्षांच्या कर्जाच्या ईएमआयला स्थगिती देण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. कोविडच्या काळात अशाच प्रकारे कर्जाच्या ईएमआयबाबत दिलासा देण्यात आला होता, असा संदर्भ त्याने दिला.

याशिवाय लोकांनी अतिशय सावध भूमिका घेत खर्च आणि खरेदी पूर्णपणे थांबवली तर त्याचा परिणाम व्यवसायांवर होऊ शकतो. अनेक व्यवसाय बंद पडल्यास लाखो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता निर्माण होईल, असा मुद्दाही या युजरने मांडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button