पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जिल्ह्यातील ७८५ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख रुपयांचा लाभ


रत्नागिरी दि. 4 ) : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या चौथ्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील ७८५ पात्र शेतकऱ्यांचा समावेश झाला असून, त्यांच्यासाठी ४ कोटी ४९ लाख रुपयांची कर्जमुक्ती मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी दिली.
कोकण विभागाचा विचार करता एकूण ६,९३९ शेतकऱ्यांना ४३.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून ७८५ शेतकऱ्यांना ४.४९ कोटी, रायगडमधील १,५९६ शेतकऱ्यांना १२ कोटी, ठाण्यातील २,४२९ शेतकऱ्यांना १४.७४ कोटी, पालघरमधील १,४९० शेतकऱ्यांना ८.४४ कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६३९ शेतकऱ्यांना ४.१० कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
राज्यात आज ४,७६४ कोटींहून अधिक रकमेचे वाटप
शासनाने २ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत राहिलेल्या पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जात आहे. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात आज राज्यभरातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ४,७६४ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
आतापर्यंत २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा
महाआयटीमार्फत राबविल्या जाणाऱ्या या संगणकीय प्रणालीवर बँकांनी ३१.१७ लाख खात्यांची माहिती नोंदवली होती. आतापर्यंत विविध याद्यांद्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८,०४० कोटी रुपयांची कर्जमुक्ती रक्कम अदा करण्यात आली आहे. चौथ्या यादीतील वाटपामुळे जिल्ह्यातील अनेक थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button