कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७ हजार ४९६ वीजचोर्‍या उघडकीस


महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७ हजार ४९६ वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत. एप्रिलपासून सुरू असलेल्या या मोहिमेत राज्यातील चार प्रादेशिक विभागांत एकूण १९ हजार ५९९ वीजचोर्‍या उघड झाल्या आहेत.
महावितरणने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी सुरू किली आहे. कोकण विभागात ७ हजार ४९६, छत्रपती संभाजीनगर विभागात ४ हजार ५९७, नागपूर विभागात ४ हजार ५२१ तर पुणे विभागात २ हजार ९८५ वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत. उघड झालेल्या एकूण वीजचोरी प्रकरणांपैकी १५ हजार ९६५ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, त्यामध्ये ३० कोटी ३६ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित ग्राहकांना वीजचोरीचे बिल देण्यात आले असून, आतापर्यंत ६ हजार ६२९ ग्राहकांनी १४ कोटी १२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. याशिवाय ४ हजार ९५९ प्रकरणांत १ कोटी ८५ लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
जुलै महिन्यात या मोहिमेला आणखी वेग देण्यात आला. या महिन्यात राज्यभरात ११ हजार ३२ वीजचोर्‍या उघडकीस आल्या. त्यात कोकण विभागातील तब्बल ४ हजार ८४ वीजचोयांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात २ हजार ३६५, नागपूरमध्ये २ हजार ३२४ आणि पुणे विभागात २ हजार २५९ वीजचोर्‍या आढळल्या.
जुलैमध्ये आढळलेल्या वीजचोरीपैकी ८ हजार ४६२ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, १५ कोटी ११ लाख रुपयांच्या वीजचोरीचे बिल संबंधितांना देण्यात आले आहे. त्यापैकी ३ हजार ३६ प्रकरणांत ६ कोटी २२ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये चोरीच्या युनिटनुसार वीजबिल आणि दंडात्मक तडजोड शुल्क आकारण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button