समाजसेवी, उद्योजक श्रीकृष्ण पर्शराम तथा बाबा रेडीज यांचे आकस्मिक निधन


चिपळूण : प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कष्टाच्या जोरावर व्यवसायाची यशस्वी वाटचाल करणारे श्रीकृष्ण पर्शराम तथा बाबा रेडीज (वय ६६) यांचे १८ ऑगस्ट रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने चिपळूणसह रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील व्यावसायिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

बाबा रेडीज यांचे शिक्षण चिपळूण येथील यु. ई. स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना क्रीडा क्षेत्राची विशेष आवड होती. कबड्डी आणि हॉलीबॉलचे उत्तम खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. पुढील काळात अनेक खेळाडू घडविण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी एस.टी.च्या सावंतवाडी आगारात मेकॅनिक म्हणून नोकरी केली. त्यानंतर वडिलांच्या मे. पी. एस. रेडीज अँड सन्स या बंदुका व दारूगोळा विक्री व्यवसायात त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकपर्यंत विस्तारला. व्यवसायाची पूर्ण जबाबदारी स्वीकारत त्यांनी मे. जयश्रीराम कंपनी या विस्फोटक विक्री व्यवसायाचा विस्तार केला.

कोयना चौथा टप्पा, दासगाव (रायगड) ते इंसुली गोवा बॉर्डरपर्यंत कोकण रेल्वेचे बोगदे व मार्ग उभारणीच्या कामासाठी लागणाऱ्या विविध साहित्याचा त्यांनी पुरवठा केला. तसेच बॉक्साईट व दगड खाणींसाठी आवश्यक साहित्य पुरविण्याबरोबरच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होलसेल व रिटेल फटाका विक्रेते म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

एकत्र कुटुंबाची परंपरा जपत त्यांनी अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. गोरगरीबांचा कैवारी आणि सत्याच्या मार्गाने चालणारा माणूस म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.
बाबा रेडीज यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार, व्यावसायिक, क्रीडाप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button