रुग्णांचे हक्क वाऱ्यावर; खासगी रुग्णालयांना राज्य सरकारने झुकते माप दिल्याची टीका!

मुंबई : खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या नव्या विधेयकातून रुग्णांच्या हक्कांसंबंधीच्या महत्त्वाच्या तरतुदीच वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे विधेयक रुग्णांपेक्षा खासगी रुग्णालयांच्या हिताचे असल्याची टीका जन आरोग्य अभियानाने केली आहे. रुग्णांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर नियंत्रित करणे, या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्धार आरोग्य हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

राज्य सरकारने जुलै २०२६ मध्ये खासगी रुग्णालयांच्या नियमनासाठी महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना विधेयकाचा मसुदा तयार केला. मात्र, या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये २७ नोव्हेंबर रोजी प्रस्तावित कायद्याबाबत रुग्ण हक्क संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी विधेयकातील त्रुटींवर बोट ठेवत आंदोलनाचा इशारा दिला. हे विधेयक केंद्र सरकारच्या कायद्यानुसार तयार केल्याचा सरकारचा दावा असला, तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांना झुकते माप देण्यात आल्याचे जन आरोग्य अभियानाचे सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी सांगितले.

यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, संयोजक विजय कान्हेकर, दीपिका शेरखाने, लारा जेसानी, जन आरोग्य अभियानाचे विनोद शेंडे, रवी देसाई, दीपक जाधव, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. स्वाती राणे, डॉ. प्रताप, शहाजी गडहिरे, अविनाश कदम, आनंद बाखाडे उपस्थित होते.

२०२१ मधील रुग्ण हक्कांच्या तरतुदी वगळल्याचा आरोप

करोनाकाळात खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवताना सरकारला अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याचा आधार घ्यावा लागला. मात्र, या कायद्यांच्या आधारे खासगी रुग्णालयांचे उपचार, शुल्क आणि रुग्णांचे हक्क यांचे प्रभावी नियमन करणे शक्य नव्हते. त्यामुळे तत्कालीन सरकारने २०२१ मध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी नियमांमध्ये बदल करून रुग्णांच्या हक्कांसाठी महत्त्वाच्या तरतुदी केल्या होत्या.

यामध्ये रुग्णांचे हक्क, उपचार सुरू असलेल्या रुग्णाला किंवा मृतदेह पैशांसाठी रोखून न ठेवणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, तक्रारींचे निवारण आणि रुग्णालयांच्या शुल्कासंबंधीच्या तरतुदींचा समावेश होता. मात्र, नव्या विधेयकात या महत्त्वाच्या तरतुदी वगळल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button