खेडशीत जखमी बिबट्याचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन; डार्ट गनने बेशुद्ध करून पुण्यात उपचारासाठी रवाना


रत्नागिरी खेडशी येथील चांद-सूर्या पॉईंट व मलुष्टे यांच्या आंबाबागेसमोर जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद करत जीवदान दिले. गुरुवारी (दि. २७) झालेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्याला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

खेडशी परिसरातील मुख्य रस्त्यालगत बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला होता. याबाबत लोकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत वनविभागाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून आवश्यक रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने पाहणी केली असता बिबट्या जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. काही वेळाने तो लंगडत व अडखळत पुढे जात असल्याचेही निदर्शनास आले. जखमी अवस्थेमुळे बिबट्या अस्वस्थ असल्याने त्याला थेट पकडणे धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने डार्ट गनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अचूक नेम साधत डार्ट गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात बंदिस्त केले. रत्नागिरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांनी घटनास्थळीच बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली. जखमी बिबट्याला अधिक चांगले व आवश्यक उपचार मिळावेत यासाठी त्याला पुढील उपचाराकरिता पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना करण्यात आले.

विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेस्क्यू मोहीम यशस्वीपणे पार पडली. यावेळी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, पशुवैद्यकीय अधिकारी स्वरूप काळे, देवरुखचे वनपाल सागर गोसावी, पालीचे वनपाल रत्नराज गायकवाड, साखरपा वनरक्षक सहयोग कराडे, फुणगुस वनरक्षक आकाश कडूकर, जाकादेवी वनरक्षक शर्वरी कदम, रत्नागिरी वनरक्षक विराज संसारे तसेच जलद प्रतिसाद पथकाचे महेश धोत्रे आणि ईशान खानोलकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, परिसरात जखमी अथवा अडचणीत सापडलेला वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याच्या जवळ न जाता तात्काळ वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी वनविभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button