वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी; हातखंबा येथे बागेत शिरल्याने खळबळ


वनविभागाचे पथक रात्री उशिरापर्यंत शोधमोहीमेत; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर हातखंबा नजीकच्या चांद-सूर्या पॉईंट परिसरात शुक्रवारी रात्री रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर तो महामार्गालगत असलेल्या मलुष्टे यांच्या बागेत जाऊन दाट झाडीत लपल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूर अथवा रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. धडकेनंतर जखमी अवस्थेतील बिबट्या विव्हळतच महामार्गाच्या बाजूला असलेल्या बागेत शिरला. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक तसेच महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी घटनास्थळी गर्दी केली.

दरम्यान, जखमी बिबट्याला पाहण्यासाठी वाढणारी गर्दी आणि अंधारामुळे तो बिथरण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिकांनी तातडीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक पिंजरा आणि आवश्यक बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

वनकर्मचाऱ्यांनी प्रथम नागरिकांची गर्दी हटवून परिसर सुरक्षित केला. त्यानंतर मलुष्टे यांच्या बागेतील दाट झाडी, झुडपे तसेच आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला. वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या जखमी असल्याने तो फार दूर गेला नसावा आणि बागेतील झाडीमध्येच आश्रय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे पथक बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करून त्याच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. दरम्यान, बिबट्याचा शोध सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनी बागेच्या अथवा झाडीच्या भागात गर्दी करू नये आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button