शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक संपन्न

संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणीसह दुष्काळ व संभाव्य पाणीटंचाईवर चर्चा

खेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघांची संघटनात्मक आढावा बैठक रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खेड येथील भरणे नाका परिसरातील हॉटेल बिसू येथे उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, जिल्हा सचिव अनिल जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी करावयाच्या नियोजित उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान सध्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि आगामी काळात उद्भवू शकणारी भीषण पाणीटंचाई हा महत्त्वाचा विषय चर्चेला आला. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करण्याची गरज संजय कदम यांनी अधोरेखित केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नालाही प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांमधील समन्वय, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि आगामी संघटनात्मक कार्यक्रम याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या आढावा बैठकीला गुहागर, चिपळूण, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यांतील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच युवासेनेचे तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button