नागपुरात हॉटेलचे दर ऐकून धक्का बसेल! ५ हजारांची खोली ३० हजारांना, एका रात्रीचे भाडे ८५ हजारांवर!

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील हॉटेलचे दर प्रचंड वाढले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी तब्बल ८५ हजार रुपये मोजावे लागत असून, मध्यम श्रेणीतील हॉटेलचे दरही पाच ते सहा पटींनी वाढले आहेत.

मागणी वाढताच हॉटेलच्या दरांना ‘उधाण’

हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, अधिकारी आणि विविध कामांसाठी राज्यभरातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. यंदा अधिवेशनासोबतच लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने हॉटेलमधील खोल्यांची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी, हॉटेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. हॉटेल दरांच्या पाहणीत पंचतारांकित हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी ५० हजार ते ८५ हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मागील वर्षी अधिवेशनादरम्यान एका नामांकित हॉटेलमध्ये डिलक्स खोलीसाठी सुमारे ७० हजार रुपये आकारले जात होते. यंदा हाच दर ८५ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

पाच हजारांची खोली आता ३० हजारांवर

केवळ पंचतारांकित हॉटेलच नव्हे, तर मध्यम श्रेणीतील हॉटेलमध्येही दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. सामान्यतः पाच हजार रुपये प्रतिरात्र दर असलेल्या खोल्यांसाठी आता २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच नियमित दराच्या तुलनेत पाच ते सहा पट अधिक रक्कम द्यावी लागत आहे. अधिवेशनाच्या काळात नागपुरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा खर्च मोठे आर्थिक आव्हान ठरणार आहे. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी आणि विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.

बसभाड्याला मर्यादा, हॉटेल दरांवर नियंत्रण नाही

खासगी बसचालकांकडून गर्दीच्या हंगामात अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने खासगी बसचे भाडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाड्याच्या दीडपट मर्यादेत ठेवले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) विशेष तपासणी मोहिमा राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांवर कारवाईही केली जाते. मात्र, हॉटेलच्या बाबतीत अशी कोणतीही दरमर्यादा नाही. त्यामुळे मागणी वाढली की हॉटेलचालकांना मनमानी दर आकारण्याची मोकळीक मिळते. हा विरोधाभास ग्राहक संरक्षणाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. हॉटेलमधील दरवाढीचा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित झाला होता. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

मागणी-पुरवठ्याचे गणित; विमान प्रवासही महागला

हॉटेल व्यवसायातील एका जाणकाराच्या मते, ऑनलाइन बुकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये मागणीनुसार दर बदलण्याची व्यवस्था असते. प्रत्येक बुकिंगनंतर दर वाढत जातात. त्यामुळे सर्व खोल्या एकाच उच्च दराने विकल्या जातात, असे नाही. नागपुरात सध्या सुमारे १० तारांकित, २०० मध्यम श्रेणीतील हॉटेल आणि अन्य २०० निवास व्यवस्था उपलब्ध आहेत. या सर्वांची मिळून सुमारे आठ ते दहा हजार खोल्यांची क्षमता आहे. काही हॉटेलमध्ये खोल्या रिकाम्या असतानाही नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम करण्याकडे कल असल्याने तेथील दर वाढतात. भविष्यात शहरात आणखी तारांकित हॉटेल सुरू झाल्यास दरांवर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबई-नागपूर विमान प्रवासाचे एकेरी भाडेही अधिवेशन काळात १५ ते २० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नागपुरात येण्यासाठी निवासासह प्रवासाचाही खर्च वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button