शिक्षणमंत्री नाही, पण उच्चशिक्षण विभागाच्या सचिवांना हटवलं; जोशींच्या जागी गंगवार; भाजप म्हणतं ‘हीच मोदी गॅरंटी

Vineet Joshi : नीट पेपरफुटीच्या विरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय फेरबदलाचा भाग म्हणून शिक्षण सचिवांची बदली करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी नरेश पाल गंगवार यांची शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली.

ते १९९४ च्या बॅचचे राजस्थान केडरमधील आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंत या पदावर असलेल्या विनीत जोशी यांची पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर झालेले हे फेरबदल उल्लेखनीय आहेत.

विनीत जोशी कोण?

विनीत जोशी हे एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. मणिपूर केडरचे १९९२ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. तीन दशकांहून अधिक काळाच्या आपल्या कारकिर्दीत, शिक्षण आणि परीक्षा क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली प्रशासकीय व्यक्तींपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. डिसेंबर २०२४ ते जुलै २०२६ या काळात त्यांनी उच्चशिक्षण विभागाचे सचिवपद भूषवले. त्यांची एनटीएचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी CUET, NEET आणि JEE यांसारख्या संगणक-आधारित राष्ट्रीय प्रवेश परीक्षा प्रणालींची सुरुवात केली.

कोण आहेत नरेश पाल गंगवार?

उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नवनियुक्त झालेले नरेश पाल गंगवार हे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयांतर्गत असलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. त्याआधी, त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केले होते. तिथे त्यांनी प्रदूषण नियंत्रण आणि घातक पदार्थ व्यवस्थापनाशी संबंधित बाबी हाताळल्या होत्या.

मुळात अभियंता असलेल्या गंगवार यांनी रुरकी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक., आयआयटी दिल्लीतून कम्युनिकेशन आणि रडार इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक. आणि राजस्थान विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. ही पदवी प्राप्त केली आहे.

आपल्या कारकिर्दीत गंगवार यांनी राजस्थान सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. शालेय शिक्षण, ऊर्जा, कृषी, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान विभागांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहण्याचा त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी जयपूर डिस्कॉमचे अध्यक्ष आणि राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. २०१० ते २०१४ या काळात ‘राष्ट्रीय सौर मिशन’च्या सुरुवातीच्या टप्प्यात राजस्थानची सौर ऊर्जा धोरणे निश्चित करण्यात गंगवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नीट पेपरफुटीवरुन दबाव

NEET परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपावरुन सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या फेरबदलाचे कोणतेही कारण सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु पेपरफुटी प्रकरणात आपला निषेध नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुणांची गर्दी वाढत असल्याने सरकारवर सतत दबाव आहे.

भाजप खासदाराकडून स्वागत

दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी या बदलाचे स्वागत करत या नियुक्तीला ‘मोदी गॅरंटी’ असे संबोधले आहे. “पेपरफुटीच्या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या शिक्षण सचिवांना पंतप्रधान मोदीजींनी बदलले आहे. प्रश्नपत्रिका फुटीस जबाबदार असलेल्यांवर, तसेच ज्यांनी यात ढिलाई किंवा निष्काळजीपणा दाखवला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मोदी गॅरंटी” असे ट्विट दुबे यांनी केले.

प्रधानमंत्री मोदी जी ने पेपर लीक मामले में उदासीनता बरतने वाले शिक्षा सचिव को बदल दिया । पेपर लीक के गुनहगारों सहित शिथिलता या उदासीनता बरतने वाले लोगों पर कड़ी कार्रवाई होगी । मोदी गॅरंटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button