
शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये विनापरवाना अन्नपुरवठा बंद; ५० मीटर परिसरातील विक्रेत्यांनाही FSSAI नियम लागू
*राज्यात अन्न भेसळविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सुरक्षिततेकडे मोर्चा वळवला आहे. राज्यातील शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये विनापरवाना अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली असून, शाळांच्या कॅन्टीनसह परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे
राज्यात सुमारे दोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि सकस आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शालेय आहारासंदर्भातील अन्न सुरक्षा नियम २०२० मध्ये जाहीर करण्यात आले असून, २०२१ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर तपासण्या आणि धाडसत्रे सुरू असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना हे नियम लागू राहणार आहेत. शाळांमधील कॅन्टीन, वसतिगृहे तसेच अंगणवाड्यांना अन्नपदार्थ पुरवणाऱ्या प्रत्येक पुरवठादाराकडे FSSAI परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे.




