
लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. 17 ) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे.
नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण
पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे.
विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे.
प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले.
वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
000




