
जगबुडी खाडीत महिनाभरापासून काळे पाणी; प्रदूषणाविरोधात हनिफ परकार यांचे प्रशासनाला निवेदन
सीईटीपी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही सुधारणा नाही; दोषींवर कारवाई करण्याची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी
खेड : तालुक्यातील जगबुडी खाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचा गंभीर आरोप करत प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते हनिफ शरीफ परकार यांनी उपविभागीय अधिकारी, खेड यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. खाडीतील प्रदूषणाची तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी आणि नद्यांचे अस्तित्व वाचवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जगबुडी खाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून काळ्या रंगाचे पाणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत सीईटीपीशी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी तसेच संदेशाद्वारे माहिती देऊन तक्रार करण्यात आली. मात्र, तक्रारीनंतरही खाडीच्या पाण्यात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील औद्योगिक प्रदूषणासाठी लोटे औद्योगिक वसाहत हा प्रमुख औद्योगिक परिसर असताना, प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणेकडून प्रभावी कार्यवाही होत नसल्याबाबत निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
खेड खाडीपट्ट्यातील वाळू डेपोवर महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार नियमित भेटी देत असतात. मात्र, वाळू डेपोच्या परिसरातील खाडीच्या पाण्याची स्थिती, वाढते प्रदूषण आणि नद्यांची होत असलेली हानी याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष का जात नाही, असा सवाल परकार यांनी उपस्थित केला आहे.
खाडीतील पाण्याचा रंग बदलणे ही गंभीर बाब असून, प्रदूषणामुळे नदी आणि खाडी परिसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, प्रदूषणाच्या स्रोताचा शोध घ्यावा आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्ती अथवा आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणीटंचाईची समस्या भविष्यात अधिक गंभीर होऊ नये आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखले जावे, यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या स्तरावर तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.




