
खेडमध्ये चिरेखाणीवर बेकायदेशीर वेठबिगारीचा प्रकार उघड; मजुरी न देता जबरदस्तीने काम, विरोध करताच मारहाण!
मुकादमांविरोधात लोटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; उत्तर प्रदेशातील मजुराची तक्रार
खेड : तालुक्यातील घाणेखुंट व दाभीळ परिसरातील चिरेखाणीवर मजुराला मजुरीचे पैसे न देता जबरदस्तीने काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काम करण्यास विरोध केला असता संबंधित मजुराला शिवीगाळ करून हाताने मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन मुकादमांविरोधात लोटे पोलीस ठाण्यात बेकायदेशीर वेठबिगारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घाणेखुंट व दाभीळ येथील चिरेखाणीवर घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मुकेश कल्लू बनवासी (वय ३३, मूळ रा. भदोही, उत्तर प्रदेश, सध्या रा. घाणेखुंट, सुवर्वेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
फिर्यादी मुकेश हे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. यावेळी मुकादम राम धनसिंग राठोड आणि भरत धनसिंग राठोड (दोघेही मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. घाणेखुंट, कातळवाडी, ता. खेड) यांनी त्यांच्या कामाचा मोबदला न देता बळजबरीने चिरेखाणीवर काम करून घेतल्याचा आरोप आहे. मजुरी न मिळाल्याने फिर्यादी यांनी काम करण्यास विरोध केला असता दोन्ही आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६२/२०२६ असून भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १४६, ३५२, ३५१(२), ११५(२), ३(५) तसेच वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियमातील कलम १६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
लोटे पोलीस दूरक्षेत्रातील तक्रार अर्ज क्रमांक १२१/२०२६ वरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार कदम पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, चिरेखाणीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या मजुरीचा प्रश्न आणि त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळतो का, तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे बळजबरी केली जाते का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.




