
कुत्रे मागे लागल्याने जीवाच्या आकांताने धावला, ज्या दुकानात आश्रय घेतला, त्याच दुकानात कोसळला; उमद्या हर्षलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
बदलापूर : शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. श्वानांच्या टोळीने पाठलाग केल्याने घाबरून पळणाऱ्या बारावीतील एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूर पश्चिमेतील शनी नगर परिसरात घडली.
हर्षल शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शिकवणीवरून मित्रांसोबत घरी परतत असताना घडलेल्या या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली असून, भटक्या श्वानांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
श्वानांच्या हल्ल्याच्या भीतीने हर्षल धावला
हर्षल हा बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. गुरुवारी दुपारी शिकवणी संपल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत शनी नगर परिसरातून घरी जात होता. याचवेळी रस्त्यावरील भटक्या श्वानांच्या टोळीने अचानक त्यांचा पाठलाग सुरू केला. श्वानांच्या हल्ल्याच्या भीतीने हर्षलने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. काही अंतर धावल्यानंतर त्याने जवळच असलेल्या एका दुकानात आश्रय घेतला. श्वानांच्या भीतीने दुकानात आल्याचे त्याने दुकानदार महिलेला सांगितले. मात्र, काही क्षणांतच तो अचानक जमिनीवर कोसळला.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हर्षलचा मृत्यू
हर्षलला बेशुद्ध अवस्थेत पाहून दुकानदार महिला आणि त्याच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घटनेची माहिती मिळताच शिकवणीच्या शिक्षकांनी धाव घेतली. त्यानंतर एका शाळेच्या व्हॅनमधून त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
श्वानांच्या बंदोबस्तासाठी लाखो रुपये खर्च, तरी परिस्थिती जैसे थे!
प्राथमिक माहितीनुसार, भटक्या श्वानांच्या अचानक झालेल्या पाठलागामुळे हर्षल प्रचंड घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी धावताना त्याला हृदयविकाराचा त्रास उद्भवला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेने बदलापूर शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये श्वानांच्या टोळ्यांचा मुक्त संचार सुरू असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्वानांच्या हल्ल्यांच्या आणि पाठलागाच्या घटना वारंवार घडत असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
श्वानांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं चित्र
भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी दरवर्षी नगर परिषदेकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील श्वानांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. रस्ते, चौक, निवासी संकुले इतकेच नव्हे तर बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातही श्वानांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे निर्बीजीकरणाच्या कामावर होणारा खर्च, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एका होतकरू विद्यार्थ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यानंतर तरी नगर परिषद प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या श्वानांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार का, असा संतप्त सवाल आता बदलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.




