
डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढणार!
नवी दिल्ली: देशाच्या संसदीय राजकारणात मोठे बदल घडवून आणणाऱ्या ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्त्वपूर्ण मंजुरी दिली आहे.
दुपारी २ वाजता पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
पावसाळीअधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा झाल्यानंतर एकाच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची ही दुसरी महत्त्वाची बैठक होती.
या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर लोकसभेच्या जागांमध्ये सुमारे ५० टक्के वाढ होणार असून, सध्याच्या ५४३ जागांची संख्या कमाल ८५० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करणे, हा या संभाव्य प्रस्तावामागील मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.
या विधेयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेले संख्याबळ आणि राजकीय आकड्यांची जुळवाजुळव केंद्र सरकारकडून जवळपास पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेला विरोधी पक्षांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भात सूचक विधान केले असल्याने, त्यांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनीही प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवल्या गेल्यास या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार केला जाईल, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
या महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे त्यानुसार येत्या ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे, तर २डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. या चार दिवसीय अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण बिलावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.




