कोकणच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलाची ‘हॉवरक्राफ्ट’ गस्त

समुद्राच्या लाटांपासून थेट वाळूत धावणारे अत्याधुनिक वाहन ठरतेय पर्यटकांचे आकर्षण.

रत्नागिरी : कोकणच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांवर भारतीय तटरक्षक दलाची अत्याधुनिक ‘हॉवरक्राफ्ट’ वाहने गस्तीवर दाखल झाली असून, समुद्र आणि वाळूवर एकाच वेगाने धावणाऱ्या या आगळ्यावेगळ्या वाहनाने पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. गणपतीपुळे यांसह जिल्ह्यातील विविध प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर या वाहनांची गस्त सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हॉवरक्राफ्टचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते पारंपरिक नौकेप्रमाणे केवळ पाण्यावरच चालत नाही, तर हवेच्या दाबाच्या सहाय्याने समुद्राच्या पृष्ठभागावरून सरकत थेट किनाऱ्यावरील वाळू, चिखल किंवा दलदलीच्या भागातही वेगाने धावू शकते. त्यामुळे समुद्रातून थेट वाळूत येणाऱ्या या वाहनाचे दृश्य किनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.

तटरक्षक दलाच्या गस्तीमुळे सागरी सुरक्षेला अधिक बळ मिळत असतानाच, या अत्याधुनिक वाहनाच्या वेगवान हालचाली पर्यटकांसाठीही आकर्षण ठरत आहेत. हॉवरक्राफ्ट किनाऱ्यावरून धावताना दिसताच अनेक पर्यटक मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये त्याचे चित्रीकरण करताना दिसून येत आहेत. या गस्तीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, कोकण किनाऱ्यावरील तटरक्षक दलाच्या या अनोख्या गस्तीची चर्चा सुरू आहे.

कोकण किनारपट्टीची सुरक्षा, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद आणि बचावकार्य करण्यासाठी हॉवरक्राफ्टची क्षमता महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेषतः समुद्र आणि जमिनीच्या सीमेवर वेगाने हालचाल करण्याची क्षमता या वाहनाला इतर पारंपरिक गस्ती नौकांपेक्षा वेगळे ठरवते.

एकीकडे तटरक्षक दलाच्या या गस्तीमुळे कोकणच्या सागरी सुरक्षेला बळकटी मिळत आहे, तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांवरून थेट वाळूत धावणारे हे अत्याधुनिक वाहन पर्यटकांसाठी कोकण किनाऱ्यावरील एक अनोखे आकर्षण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button