
बालविवाहमुक्त रत्नागिरीसाठी प्रशासनाचा पुढाकार; नवनिर्माण हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी, दि. २७ ) : बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असून, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतो. ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’ ची प्रभावी अंमलबजावणी करून रत्नागिरी जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ मार्फत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथील नवनिर्माण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विवाहाचे कायदेशीर वय, बालविवाहाचे दुष्परिणाम, २००६ च्या कायद्यातील कठोर तरतुदी आणि बालकांचे मूलभूत हक्क व सुरक्षितता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चे कार्य आणि महिला व बाल विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.
बालविवाह रोखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर पालक, शिक्षक, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




