
‘महावितरण’च्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज, विलंब आकारात १०० टक्के माफी!

ठाणे : महावितरणने वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. योजनेत थकबाकीवरील संपूर्ण व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी देण्यात येत असून उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यावर आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. याशिवाय, मागणीनुसार वीजजोडणीची पुनर्जोडणी तात्काळ करून देण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या योजनेला भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ८२० कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी योजनेत सहभागी होत लाखो रुपयांची बचत केली आहे.
ठाणे मंडळातील १८८ ग्राहकांनी १ लाख ५ हजार रुपयांची बचत केली असून, त्यांची एकूण थकबाकी ७ लाख ५८ हजार रुपये होती. त्यापैकी ५ लाख ८४ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तर वाशी मंडळातील १०५ ग्राहकांनी १ लाख ५५ हजार रुपयांची बचत केली असून, त्यांची एकूण थकबाकी १० लाख ४६ हजार रुपये होती. त्यापैकी ७ लाख ७३ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.
पेण मंडळातील ५२७ ग्राहकांनी सहभाग नोंदवून २ लाख ३० हजार रुपयांची बचत केली आहे. या ग्राहकांची एकूण थकबाकी १८ लाख ५४ हजार रुपये होती. त्यापैकी त्यांनी १३ लाख ९८ हजार रुपयांचा भरणा केला आहे. अशा प्रकारे भांडुप परिमंडळातील अभय योजनेत सहभागी झालेल्या ८२० ग्राहकांची ३६ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी होती.
या ग्राहकांनी योजनेअंतर्गत २७ लाख ५५ हजार रुपयांचा भरणा केला असून, त्यांना एकूण ४ लाख ९० हजार रुपयांची बचत केली आहे. ६ नोव्हेंबर पासून सुरु झालेली ही योजना १५ जानेवारी २०२७ पर्यंत असणार आहे असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या पात्र ग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्यासाठी आणि वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी अभय योजना २०२६-२७ चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.– संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण.




