
टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी : शहरातील जोशी पाळंद येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साईश दिलीप बाईग (रा. जोशी पाळंद आर्केड, जोशी पाळंद, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सातच्या सुमारास तो टेरेसवर फिरत असताना तोल जाऊन खाली पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
साईश गेल्या सात-आठ वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता व त्याच्यावर उपचार सुरू होते. टेरेसवर फिरण्याची त्याला सवय होती. घटनेची माहिती मिळताच त्याच्या वडिलांनी खाली जाऊन पाहिले असता तो गंभीर अवस्थेत आढळला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.



