
भोस्ते घाटात दोन कारची समोरासमोर धडक; दोघे जखमी
एकदिशा वाहतुकीत विरुद्ध दिशेने वाहन आल्याने अपघात?; मदत ग्रुपच्या तत्परतेने जखमींना तातडीने उपचार

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाडहून सावर्डेच्या दिशेने जाणारी अल्टो कार भोस्ते घाटातून मार्गक्रमण करत असताना चिपळूणहून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या एन्जॉय वाहनाशी तिची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात दोघे जखमी झाले.
विशेष म्हणजे, भोस्ते घाटातील या मार्गावर एकदिशा वाहतूक व्यवस्था असतानाही विरुद्ध दिशेने वाहन आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे एकदिशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यावर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप, खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी तत्काळ स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आनंद घोले यांच्या मदतीने त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वेळ न दवडता जखमींना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रसाद गांधी आणि आनंद घोले यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपघातानंतर वेळेत मिळालेली मदत जखमींसाठी महत्त्वपूर्ण ठरली.




