“पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ‘हाय फॅट’, ‘शुगर’, ‘सॉल्ट’चा इशारा देणारी माहिती छापा”; सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला निर्देश!___

  • पाकिटबंद खाद्यपदार्थांवर मीठ, साखर आणि फॅटचं प्रमाण अधिक असल्यास ग्राहकांना धोक्याचा इशारा देणारे लेबल्स त्यावर लवकरच दिसण्याची चिन्हं आहेत. याचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला म्हणजेच FSSAI ला तसे निर्देश दिले आहेत. FSSAI ने पाकिटबंद खाद्यपदार्थांबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे तयार करावीत आणि नवे नियम करावेत असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिले पाकिटबंद खाद्यपदार्थांवर इशारा देणारे लेबल्स लावण्याचे निर्देश

ग्राहक जेव्हा पाकिटबंद अन्नपदार्थ खरेदी करतात तेव्हा त्याचं लेबलिंग पाहतात. त्यात किती प्रोटीन्स आहेत, साखर किंवा मीठ जास्त तर नाही हे सगळं पाहिलं जातं. मात्र अनेक बड्या कंपन्या अत्यंत चलाखीने पॅकबंद अन्नपदार्थांचे फायदे मोठ्या अक्षरात छापतात पण साखरेचं प्रमाण, मीठाचं प्रमाण, फॅट किती आहेत हे छापण्यासाठी लहान टाइप वापरतात जो फारसा लक्षात येत नाही. ही बाब लक्षात घेऊनच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की पाकिटबंद खाद्यपदार्थ म्हणजेच वेफर्स, शेंगदाणे, बिस्कीटं इथपासून सगळ्याच पाकिटबंद खाद्यपदार्थांवर हाय शुगर, हाय सॉल्ट, हाय फॅट हे मोठ्या अक्षरात आणि षटकोनात छापणं महत्त्वाचं असेल. सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला या संदर्भातले निर्देश दिले आहेत. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे?

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सांगितलं की पाकिटबंद पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटची कमाल मर्यादा निश्चित केली जाणं हे आवश्यक आहे. इशाऱ्यासाठी ठरवलेली मर्यादा इतकी कमी नसावी की पाकिटावर इशारा छापावा लागेल आणि इतकी जास्तही नसावी की आरोग्याला हानी होईल असं प्रमाण यातून सुटून जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार खाद्यपदार्थांच्या मुख्य दर्शनी भागावर षटकोन तयार करावेत त्यात पदार्थात जर High Fat असतील तर तसं, साखर जास्त असल्यास High Sugar, मीठ जास्त असल्यास High Salt हे स्पष्ट दिसेल असं छापलं जावं. पाकिटाच्या मुख्य भागातील ४ ते ५ टक्के जागा व्यापेल असा षटकोन असावा याची काळजी घ्यावी. तसंच षटकोनात जे लिहिलं जाणार आहे त्याचा फाँट इतका स्पष्ट असावा की ग्राहकांना तो अगदी सहजपणे वाचता येईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये मीठ, साखर आणि फॅट्स यांचं अधिक प्रमाण असल्यास ग्राहकांना तसा स्पष्ट इशारा मिळाला पाहिजे यासाठी 35 अँड अवर हेल्थ सोसायटी या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. तसंच ही व्यवस्था लागू करण्यात होणाऱ्या दिरंगाईवरून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही एकदा FSSAI ला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे आता लवकरच पाकिटबंद खाद्यपदार्थांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे पदार्थांमध्ये कुठलं प्रमाण जास्त आहे हे सांगणारा इशारा दिसणार हे निश्चित मानलं जातं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button