
कोकणचे पाणी मुंबईला वळविण्याला कोकणातूनच विरोधाचा आगडोंब ! ६७ टीएमसी पाण्यावरून रणकंदन; कोकणच्या हक्कासाठी लोकप्रतिनिधी आक्रमक!
रत्नागिरी : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला वळविण्याच्या प्रस्तावावरून आता कोकणात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. कोकणाच्या हक्काचे पाणी मुंबईला देण्याच्या हालचालींना स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनच विरोध होऊ लागल्याने या प्रश्नाला राजकीय धार चढली आहे.
कोकणात मुबलक पाऊस पडत असतानाही अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोकणाच्या हक्काचे पाणी मुंबईकडे वळविणे म्हणजे स्थानिक जनतेच्या हक्कावर गदा आणण्यासारखे असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि आमदार शेखर निकम यांनी या प्रस्तावाविरोधात ठाम भूमिका घेतल्याने कोकणच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘आधी कोकणाला पाणी, मगच मुंबईचा विचार!’
कोकणचे पाणी मुंबईला नेण्याच्या प्रस्तावावर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका मांडली. “आधी कोकणाला पुरेसे पाणी मिळू द्या, त्यानंतरच दुसरा कोणताही निर्णय घ्या,” असा स्पष्ट इशारा देत कोकणच्या पाण्याच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीनही जिल्हे सर्वप्रथम पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाले पाहिजेत. येथील जनता, शेती, उद्योग, व्यवसाय आणि वीजनिर्मिती या सर्वच बाबी पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर पहिला हक्क कोकणातील जनतेचा असला पाहिजे. कोकणाच्या गरजा पूर्ण होण्यापूर्वी अन्यत्र पाणी वळविण्याचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, अशी ठाम भूमिका केंद्रे यांनी मांडली.
या प्रस्तावाला कोकणातून तीव्र विरोध होत असल्याचे सांगताना त्यांनी जनतेच्या भावनांसोबत आपण, जिल्हा प्रशासन आणि पक्षातील नेते ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. “आपली संस्कृतीच हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची आहे. त्यामुळे कोकणच्या पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला, तर तो चुकीचा ठरणार नाही,” असेही त्यांनी बजावले.
समुद्रात वाहून जाणारे पाणी अडविण्याची मागणी
कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने बहुतांश पाणी थेट समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडवून त्याचा उपयोग स्थानिक शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, उद्योग आणि वीजनिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. नद्या, धरणे आणि बंधाऱ्यांचे शास्त्रीय नियोजन केल्यास कोकणातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. त्यामुळे कोकणातील जनतेच्या हक्काचे पाणी आधी कोकणालाच मिळाले पाहिजे, असा आग्रह केंद्रे यांनी धरला.
‘कोकणची तहान भागल्याशिवाय पाणी मुंबईला जाऊ देणार नाही!’
दरम्यान, आमदार शेखर निकम यांनीही कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोकणातील पाणीप्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. कोकणातील जनतेची तहान भागल्याशिवाय हे पाणी अन्यत्र वळविणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कोयना धरणातील पाणी मुंबईला नेण्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली असली, तरी त्याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. कोकणातील अनेक गावांना आजही पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करून पाणी मुंबईकडे वळविण्याचा निर्णय घेऊ नये, असे निकम यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी आयआयटीकडे सोपविल्याची माहितीही त्यांनी दिली. पाणी उपशासाठी विजेचा खर्च कमीत कमी राहील, असे नियोजन करून धामणवणे, टेरव तसेच खालच्या गावांतील नळपाणी योजनांसह रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचनासाठी अधिकाधिक पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कोकणचा हा महत्त्वाचा प्रश्न आगामी विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हापूसच्या मानांकनासाठीही पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन
दरम्यान, कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनाच्या कक्षेत वलसाड आणि जुन्नरचा समावेश करण्याच्या हालचालींवरही आमदार निकम यांनी चिंता व्यक्त केली. कोकणच्या हापूसची विशिष्ट चव, सुगंध आणि दर्जा यामुळे त्याला देश-विदेशात स्वतंत्र ओळख मिळाली आहे. हा प्रश्न केवळ आंबा उत्पादकांच्या आर्थिक हिताचा नसून कोकणच्या अस्मितेशी जोडलेला आहे, असे त्यांनी नमूद केले.भौगोलिक मानांकनाचा हा विषय कायदेशीर स्वरूपाचा असल्याने कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
एकीकडे कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याचा प्रस्ताव आणि दुसरीकडे हापूसच्या भौगोलिक मानांकनाचा प्रश्न, अशा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरून कोकणच्या हक्कांची लढाई तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींकडूनच विरोधाचे सूर उमटू लागल्याने आगामी काळात हा संघर्ष अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.




