
राजापूरच्या आमसभेत प्रशासनाला आमदार किरण सामंत यांनी धरले धारेवर
अवैध दारू विक्रेत्यांना तडीपार करण्याचे प्रांताधिकाऱ्यांना निर्देश; पतन विभाग आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी

राजापूर : तालुक्यातील विविध गावांमधील प्रलंबित विकासकामे, पाणीटंचाई, रस्ते, अवैध दारू विक्री, वन्यप्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान, दिव्यांगांचे प्रश्न अशा विविध विषयांवर राजापूर तालुक्याच्या आमसभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेत त्यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रार अर्जांचे वाचन करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. जनतेच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. वारंवार अवैध दारू विक्री करणाऱ्यांना तडीपार करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.

या आमसभेला प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, पोलीस निरीक्षक अमित यादव, पंचायत समितीच्या सभापती सौ. कदम, उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी कुंभार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
देवघळी बीचच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा
कशेळी ग्रामपंचायतीच्या निवेदनावर चर्चा सुरू असताना कशेळी येथील देवघळी बीचवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षण कठडा अथवा अन्य आवश्यक व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली. यावर पतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या निधीच्या तरतुदीतून हे काम करता येणार नसल्याचे सांगितले. त्यावर आमदार किरण सामंत यांनी नाराजी व्यक्त करत देवघळी बीचसाठी पतन विभागाला सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. या निधीतून कायमस्वरूपी काम होईपर्यंत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरती संरक्षण व्यवस्था तातडीने उभारावी, असे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य विभागाच्या अनुपस्थितीवर नाराजी
राजापूर शहरातील रुग्णवाहिकेच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना तालुका आरोग्य अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य विभागातील उपस्थित कर्मचारीही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले. यावर आमदार सामंत यांनी तालुका आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
अवैध वृक्षतोड आणि गवा रेड्यांच्या नुकसानीचा प्रश्न
पाचल येथील अमर जाधव यांनी परिसरातील अवैध वृक्षतोडीचा प्रश्न उपस्थित केला. जितक्या प्रमाणात वृक्षतोड होईल, तितक्याच प्रमाणात नव्याने वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. यावर आमदार सामंत यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
कोंडये आणि अनसुरेतील पाणीप्रश्न मार्गी लावा
कोंडये तर्फ सौंदळ येथील राजेश सपकाळ यांनी गावातील बौद्धवाडीमध्ये पाणीटंचाई निर्माण होत असून जलजीवन मिशनचे कामही अपूर्ण असल्याचा प्रश्न मांडला. यावर आमदार सामंत यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
अनसुरे येथील प्रवीण गावकर यांनी दांडेवाडीतील जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तसेच आडीवाडी येथील रस्त्याची समस्या मांडली. मनरेगा अंतर्गत कामगारांची ऑनलाइन हजेरी नोंदवली जात असल्याने अनेक कामगारांची मजुरीची रक्कम अडकली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. यावर स्थानिक पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे निर्देश आमदारांनी दिले.
सणासुदीला एसटी फेऱ्या बंद करू नका
मेघनाथ गोसावी यांनी दिवाळी तसेच अन्य सणांच्या काळात गावागावांतील एसटी बसफेऱ्या कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्या जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आमदार किरण सामंत यांनी राजापूर एसटी आगारात नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सणासुदीच्या काळात गावांमधील बसफेऱ्या बंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
खैर वृक्षतोड प्रकरणी पोलिसांना निर्देश
जळगाव येथील भूषण सावंत यांनी खैर वृक्षतोडीबाबत दाखल झालेला गुन्हा आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करून प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश आमदार सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा
नाटेचे सरपंच संदीप बांदकर आणि सचिन बांदकर यांनी साखरी-नाटे परिसरात गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. संबंधित विक्रेत्यांची माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याचे सांगत त्यांनी लेखी निवेदनही सादर केले.
यावर आमदार सामंत यांनी गोवा बनावटीच्या दारूची विक्री पूर्णपणे थांबली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले.
बारसू येथील विनायक कदम यांनीही अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. काही अवैध दारू विक्रेत्यांकडून राजकीय नेत्यांची नावे सांगून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. यावर आमदारांनी पोलिसांना कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच वारंवार अवैध दारू विक्री करताना आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तडीपार करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश प्रांताधिकारी विश्वजित गाताडे यांना दिले.
दिव्यांगांना नगरपरिषदेच्या फेऱ्या मारायला लावू नका
गुजराळे येथील सुशांत मराठे यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या मांडल्या. राजापूर नगरपरिषदेत दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा नसल्याने त्यांना कार्यालयात जाण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्याधिकारी दिव्यांगांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याने आणि पाच टक्के दिव्यांग निधीचे प्रस्ताव वेळेत मंजूर होत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणले.
यावर आमदार सामंत यांनी दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. दिव्यांगांना निधीसाठी नगरपरिषदेच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तर प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन मदत पोहोचवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या आणि नागरिकांना भेटण्याच्या वेळा निश्चित करून त्याबाबतचा फलक कार्यालयाच्या दरवाजावर लावावा, असेही निर्देश दिले.
ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गाचे खड्डे तातडीने भरा
अजीम जैतापकर यांनी ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली. यावर आमदार किरण सामंत यांनी या रस्त्याच्या विकासासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्याच्या रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने भरावेत, असे आदेश दिले.
साखरी-नाटेच्या कचरा व्यवस्थापनासाठी निधीची मागणी
मलिक गडकरी यांनी साखरी-नाटे ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. विशेषतः कचरा निर्मूलन आणि व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारे तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी आपल्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न आमसभेत मांडले. आमदार किरण सामंत यांनी प्रत्येक प्रश्नाची दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, केवळ कागदोपत्री उत्तरे न देता प्रत्यक्षात समस्या सोडवाव्यात, असा स्पष्ट संदेश या आमसभेतून देण्यात आला.




