
कळमुंडीत घरफोडी; मोलकरणीसह दोघांविरोधात गुन्हा, साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
चिपळूण तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, घरातील मोलकरणीने साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी सुयोग संतोष बेलवलकर (वय ३०, रा. हनुमानवाडी, कळमुंडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी ५ ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ या कालावधीत घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञातरीत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करण्यात आला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
चोरीस गेलेल्या ऐवजात मंगळसूत्र, सोन्याची चेन, ब्रेसलेट, पेंडंट, अंगठ्या, कानातील दागिने, सोन्याची नाणी, नथ, सोन्याचे मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान घरात काम करणारी दीपिका दिलीप बोबले (वय ४०, रा. आवेरीवाडी, कळमुंडी) आणि तिचा साथीदार गणेश काशिराम गोरीवले (वय ३१, रा. कळमुंडी) यांच्याविरोधात संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) व ३(५) अन्वये चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२४/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




