प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी; जिल्ह्यात २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे


रत्नागिरी, दि. २६ ) : अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) प्रवर्गात नावे समाविष्ट झाल्यामुळे ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत येऊ शकली नाहीत, अशा मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने नाव नोंदणीची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या मतदारांनी आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (BLO) जमा करावे. यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ राबवला जात आहे. या अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. या यादीतून ASDD प्रवर्गामुळे नावे वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करता यावे, यासाठी आयोगाने १७ नोव्हेंबरच्या पत्रान्वये सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक:

  • गणना प्रपत्रे वितरण व संकलन: १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६
  • विशेष नोंदणी शिबिरे: २८ व २९ नोव्हेंबर २०२६ (सर्व मतदान केंद्रांवर)
  • गणना प्रपत्रे निकाली काढणे: १० डिसेंबर २०२६ पर्यंत
    मतदारांना गणना प्रपत्र भरून देणे सोयीचे व्हावे यासाठी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरे होणार आहेत. या शिबिरांना सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) संबंधित केंद्रांवर उपस्थित राहावे, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button