
गुहागरमधील रद्द झालेल्या एमआयडीसीला पुन्हा मान्यता; भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी १०० एकर जागेत औद्योगिक क्षेत्र उभारणार
रत्नागिरी– गुहागर विधानसभा मतदारसंघातील रद्द करण्यात आलेल्या एमआयडीसीला राज्य सरकारने पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाणे येथे झालेल्या बैठकीत या नव्या एमआयडीसीला तत्त्वतः मान्यता दिली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील १४ गावांच्या परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने सुमारे १५ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर या औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मागे पडला. त्यातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने अचानक ही एमआयडीसी रद्द केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या निर्णयामुळे आमदार भास्कर जाधव यांनाही मोठा राजकीय धक्का बसला होता.
आता मात्र या औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीचा मार्ग पुन्हा मोकळा होण्याची चिन्हे आहेत. गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी उद्योगांसाठी सलग १०० एकर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी एकखिडकी योजना राबविण्याबाबतही प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत.
या प्रक्रियेसाठी प्रांताधिकारी आकाश लीगाडे यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुहागर मतदारसंघातील १४ गावांच्या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासह स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




