
माजी लोकप्रतिनिधीचे २००२ च्या मतदारयादीत नाव गायब; शासकीय अनागोंदीचा फटका!
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तब्बल १३वर्षे कार्यरत राहिलेल्या आणि ५ वर्षे उपसरपंच व ५ वर्षे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या जयगड येथील माजी लोकप्रतिनिधीचे नावच निवडणूक आयोगाच्या २००२ च्या मतदार यादीतून गायब असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि सदोष कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (AERO) लेखी अर्जाद्वारे जाब विचारला आहे.
सध्या निवडणूक आयोगातर्फे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सन २००२ च्या मतदार यादीची पडताळणी करत असताना जयगड येथील रहिवासी अनिरुद्ध साळवी यांचे नाव यादीत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे साळवी यांचे लग्न जुलै २००० मध्ये झाले असून, त्यांच्या पत्नीचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत समाविष्ट आहे, परंतु स्वतः साळवी यांचे नाव मात्र गायब आहे.
अनिरुद्ध साळवी यांनी १९९६ ते १९९९ या काळात ग्रुप ग्रामपंचायत जयगडचे सदस्य व उपसरपंच म्हणून काम केले. त्यानंतर १९९९ ते २००४ या कालावधीत सलग ५ वर्षे त्यांनी जयगडचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे २००९ ते २०१४ या काळात पुन्हा निर्वाचित सदस्य म्हणून काम पाहिले. सुमारे तीन टर्म (१३ वर्षे) ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीत कार्यरत राहून अनेक नवमतदारांची नोंदणी करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे नावच शासकीय यादीतून गायब झाल्याने प्रशासकीय अनागोंदीचा पर्दाफाश झाला आहे.
“माझ्या स्वर्गवासी आईचे नाव तत्कालीन यादीत असल्याने बीएलओ (BLO) कडून मॅपिंगदरम्यान माझे नाव राहू शकले, अन्यथा मला अत्यंत गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ प्रक्रियेला सामोरे जावे लागले असते,” असे साळवी यांनी सांगितले. २००२ ची मतदार यादी अत्यंत सदोष असून, यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शासकीय कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि या गहाळ प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच माझे नाव गायब कसे झाले याचा शोध घेऊन केलेली कार्यवाही लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी साळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. “मूलभूत अधिकारांवरच गदा आणणारा हा प्रकार असून, प्रशासनाने थातूरमातूर उत्तरे न देता याप्रकरणी ठोस शोध घ्यावा,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.




