
नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी
दारव्हा – तालुक्यातील मागकिन्ही येथे तलावाची पाहणी आणि मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी आलेले मंत्री नितेश राणे यांच्या दौर्यादरम्यान ठाकरेसेनेच्या पदाधिकार्यांनी घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.यावेळी आंदोलकांनी मंत्री राणे यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला.
दारव्हा तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंत्री राणे यांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न करीत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मागकिन्ही येथील तलावाची पाहणी करण्यासाठी मंत्री राणे आले असताना ठाकरेसेनेच्या पदाधिकार्यांनी मच्छीमारांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केले. मच्छीमारांबाबत एवढीच सहानुभूती असेल, तर त्यांच्या नुकसानीची भरपाई आणि ठोस मदत जाहीर करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.




