प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी खेड नगरपालिकेची धडक मोहीम; ३५ व्यावसायिकांवर कारवाई!

खेड : शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने खेड नगरपालिकेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी कडक पावले उचलली आहेत. स्वच्छता अभियान २०२६ अंतर्गत शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ३५ व्यावसायिकांवर कारवाई करून सुमारे २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून, नाल्यांमध्ये प्लास्टिक कचरा अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होतात. तसेच प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर शासनाच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या २०१८ मधील प्लास्टिक व थर्माकोल बंदी अधिसूचनेनुसार प्रतिबंधित वस्तूंच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या नियमांनुसार हँडल असलेल्या किंवा नसलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविलेली एकदाच वापरायची ताटे, कप, ग्लास, वाट्या, डबे, चमचे, काटे, सु-या, स्ट्रॉ, ट्रे, स्टिरर आदी वस्तूंवर बंदी आहे. याशिवाय सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल साहित्य आणि इतर अधिसूचित सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंच्या वापरावरही निर्बंध आहेत.
प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी नगरपालिका प्रशासनाने व्यापारी वर्गाची बैठक घेऊन प्रतिबंधित प्लास्टिक वस्तूंच्या वापरासंदर्भातील नियमांची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, तसेच ग्राहकांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
दरम्यान, केवळ जनजागृतीपुरती मोहीम मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष बाजारपेठेत तपासणी आणि कारवाईवर भर देण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासनाकडून दररोज विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ३५ व्यावसायिकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला वेग आल्याचे चित्र आहे.
प्लास्टिक बंदी ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी त्यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. खरेदीसाठी कापडी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही नियमित तपासणी करून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
खेड शहर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेची ही मोहीम कितपत प्रभावी ठरते आणि व्यापारी वर्गाकडून नियमांचे किती काटेकोर पालन केले जाते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button