रत्नागिरीचा चिन्मय बेर्डे ठरला छंद सम्राट

पुण्यातील संस्थेतर्फे सन्मान; १४५ देशांची नाणी आणि नोटांचा संग्रह

रत्नागिरी : विविध देशांतील नाणी व नोटा यांचा संग्रह करणे आणि त्यांचा अभ्यास करणे या आगळ्यावेगळ्या छंदासाठी पुणे येथील छंद सम्राट सामाजिक संस्थेतर्फे यंदाचा ‘छंद सम्राट पुरस्कार’ देऊन लांजा तालुक्यातील चिन्मय जगन्नाथ बेर्डे याला गौरविण्यात आले. पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अँड प्लॅनेटरीम ऑटो क्लस्टर चिंचवड येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिन्मयला लहानपणापासून विविध देशांतील नाणी व नोटा यांचा संग्रह करणे आणि त्यांचा अभ्यास करण्याचा छंद लागला आहे. शाळेत एका मित्राकडून परदेशात आपला भारतीय रुपया चालत नाही; प्रत्येक देशाचे स्वतंत्र चलन असते या मिळालेल्या माहितीने चिन्मयच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच विविध देशांच्या चलनांविषयी आवड निर्माण होऊ लागली. सुरुवातीला फायबरची विविध चलने जतन करण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांकडून हळूहळू विविध प्रकारची खरी नाणी, त्या नाण्यांवरील चित्रे, चिन्हे आणि रचना त्याला आकर्षित करू लागली. त्यातून परदेशी नाण्यांविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले. हळूहळू हा छंद केवळ नाणी व नोटा जमा करण्यापुरता मर्यादित न राहता, त्यांच्या मागील इतिहास, संस्कृती, कला, परंपरा आणि चलनव्यवस्थेचा अभ्यास करण्याकडे वळला. या छंदाचे विशेष आवडीमध्ये रूपांतर झाले आणि त्याविषयी अधिक सखोल अभ्यास करण्याची आवड महाविद्यालयीन जीवनात निर्माण झाली.
या छंदातून मिळालेल्या विविध संधी मिळाल्या आहेत. येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी छात्रावासामध्ये २०१५ साली प्रदर्शनाला सुरुवात केली. ‘आर्ट सर्कल, रत्नागिरी’च्या थिबा महोत्सव येथील ‘कलाजत्रा’ या प्रदर्शनामध्ये २०१८, २०१९ आणि २०२० या वर्षी विशेष निमंत्रित म्हणून सहभाग घेतला. २०१७ साली ‘ नगरवाचनालय रत्नागिरी ‘ यांच्या व्याख्यानमालेत प्रदर्शन मांडण्याची संधी मिळाली. २०१९ साली रत्नागिरीमधील आर्टिस्ट्री क्लबने आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन सहभाग घेतला.
‘अर्थक्रांती’चे प्रणेते अनिल बोकील, दीपक करंजीकर, नाट्य दिग्दर्शक राजेश देशपांडे, डॉ. गिरीश ओक आदींसह अनेकांनी त्याच्या या छंदाचे विशेष कौतुक झाले.

चिन्मयच्या संग्रहात आत्तापर्यंत १४५ पेक्षा जास्त देशांची एकूण ८५०० पेक्षा जास्त नाणी आणि ९०० पेक्षा जास्त नोटांचा समावेश असून आत्तापर्यंत लहानमोठ्या अशा एकूण १५ प्रदर्शनामध्ये सहभाग आणि २ वेळा रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर मुलाखत झाली आहे.

विविध देशांतील नाणी व नोटांचा संग्रह करणे हा माझ्यासाठी केवळ छंद नसून, जगातील विविध देशांचा इतिहास, संस्कृती आणि वैविध्य समजून घेण्याचे एक माध्यम आहे. प्रत्येक नाणे आणि नोट ही त्या काळाची व त्या देशाच्या संस्कृतीची एक वेगळी ओळख जपून ठेवते, या दृष्टिकोनातून मी माझ्या संग्रहाकडे पाहतो.

  • चिन्मय बेर्डे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button