गोपाळ कृष्ण पतसंस्थेच्या कथित अपहार प्रकरणात शाखाधिकाऱ्याला जामीन मंजूर!

खेड : दापोली येथील श्री गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक अपहार प्रकरणात अटक करण्यात आलेले पतसंस्थेचे शाखाधिकारी भिकू रामचंद्र मोरे यांना खेड येथील मे. जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. अश्विन शाहु भोसले यांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले.
दापोलीतील संबंधित पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अनियमितता आणि अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले होते. या प्रकरणात शाखाधिकारी भिकू रामचंद्र मोरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या वतीने खेड येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अॅड. अश्विन शाहू भोसले यांनी न्यायालयात कायदेशीर बाजू मांडली. बचाव पक्षाचा युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी जामीन अर्ज मंजूर केला. त्यानुसार २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या जामीन मंजुरीमुळे दापोलीतील गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक अपहाराचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. लेखापरीक्षणात समोर आलेल्या आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता, कथित बनावट कागदपत्रे आणि या प्रकरणातील इतर बाबींच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे सभासदांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यामुळे आरोपीवरील आरोप सिद्ध किंवा खोटे ठरलेले नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button