कशेडी येथे अपघातात अनोळखी ५५ ते ६० वर्षीय इसमाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे खेड पोलिसांचे आवाहन

मुंबई-गोवा महामार्गावर बोलेरो पिकअपने दिली धडक; मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी ओझरवाडी येथे २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. MH-08-BK-0954) वरील चालकाने संबंधित इसमाला धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत इसमाचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १६०(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसल्याने खेड पोलीस ठाण्याने तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना याबाबत माहिती देऊन आपल्या गावातील कोणती व्यक्ती बेपत्ता आहे का, याची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित मृत इसम आपल्या गावातील अथवा परिसरातील असल्याची शक्यता असल्यास त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना तातडीने सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून ओळख पटविण्याच्या दृष्टीने मृतदेह राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी मृत व्यक्तीची ओळख पटल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. संपर्क : उदय भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, खेड पोलीस ठाणे – ९१३०३३४६१६.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button