
राजस्थानात क्रूझरची ट्रकला धडक, महाराष्ट्रातल्या ९ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू!
The cruiser crashed into a truck parked on the side of the road : खाटू श्याम मंदिराचं दर्शन करुन महाराष्ट्रातील भाविक परतत असतानाच भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. शंभूपुरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींवर सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेली तीन कुटुंबं स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना, रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून मदतीसाठी पुढे आलेल्या व्यक्तींचे पायही थरथर कापल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा अंदाज
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. या घटनेत ९ जण जागीच दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने महामार्गावर बेकायदेशीररीत्या उभी राहणारी अवजड वाहने आणि रात्रीच्या प्रवासातील चालकांच्या सतर्कतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.




