
चिपळूणकरांनो, पाणी जपून वापरा! पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात
२ वेळा होणारा पाणीपुरवठा आता दिवसातून एकदाच; १ तासाऐवजी मिळणार दीड तास पाणी. २३ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू; संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नगरपरिषदेचा खबरदारीचा निर्णय
चिपळूण : अल्प प्रमाणात झालेला पाऊस आणि दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान लक्षात घेता भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल चिपळूण नगरपरिषदेला लागली आहे. संभाव्य पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषदेने आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन सुरू केले असून, शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात सध्या दिवसातून दोन वेळा होणारा पाणीपुरवठा आता एकाच वेळेत केला जाणार आहे. पूर्वी प्रत्येकी एक तास होणारा पाणीपुरवठा आता एक वेळ दीड तास करण्यात येणार आहे. रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
चिपळूण नगरपरिषदेने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शहरातील सर्व नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. यंदा अल्प प्रमाणात झालेला पाऊस तसेच दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नगरपरिषदेने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शासनाच्या पाणी कपातीसंदर्भातील निर्देशानुसार उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आणि पाणी बचतीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड या भागांना खेडी दत्त मंदिर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या केंद्रातून चिपळूण नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. आतापर्यंत दिवसातून दोन वेळा प्रत्येकी एक तास पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता दिवसातून एकदाच एक तास तीस मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पाणीटंचाईचे संभाव्य संकट निर्माण होण्यापूर्वीच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करता यावे, या उद्देशाने नगरपरिषदेने हा निर्णय घेतल्याचे जाहीर आवाहनात नमूद केले आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना आपल्या दैनंदिन पाण्याच्या वापराचे नियोजन नव्या वेळापत्रकानुसार करावे लागणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या वेळेत करण्यात आलेला हा बदल म्हणजे आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी उचललेले प्रतिबंधात्मक पाऊल असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नगरपरिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘पाणी वाचवा, पाणी जपून वापरा! आजची पाणी बचत, उद्याची पाणी सुरक्षा!’ या संदेशातून नगरपरिषदेने नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आता नगरपरिषदेच्या या निर्णयाला चिपळूणकर कितपत प्रतिसाद देतात आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून संभाव्य पाणीटंचाईचे संकट कितपत टाळता येते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.



