
15 जानेवारीपासून राज्याच्या किमान तापमानात पुन्हा एकदा मोठी घट होण्याचे संकेत
संक्रांतीचा सण साजरा होत असतानाच निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला गारठा आता पुन्हा एकदा मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.हवामान विभागाने दिलेला इशारा मुंबईकरांपासून ते विदर्भवासियांपर्यंत सर्वांची धाकधूक वाढवणारा आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात थोडी वाढ झाली असली आणि उकाडा जाणवत असला, तरी हा दिलासा तात्पुरता असल्याचे दिसत आहे. आज 14 जानेवारी रोजी ही स्थिती कायम राहणार असली, तरी उद्या 15 जानेवारीपासून राज्याच्या किमान तापमानात पुन्हा एकदा मोठी घट होण्याचे संकेत मिळाले आहेतधुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भंडारा 10, यवतमाळ 10.2, गोंदिया 10.4 आणि जळगावमध्ये 10.9 अंश सेल्सिअस इतका पारा खाली घसरला आहे. नागपूरमध्ये देखील 11 अंश सेल्सिअस तापमानामुळे हुडहुडी कायम आहे. दुसरीकडे, कोकण किनारपट्टीवर मात्र हवामान काहीसे उष्ण आहे. रत्नागिरी आणि मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. देशाचा विचार केल्यास पंजाबमधील बल्लोवाल सौंखरी येथे पारा शून्य अंशावर पोहोचला आहे, तर केरळमध्ये तो 36.6 अंशांपर्यंत वर गेला आहे.




