भेसळयुक्त गुळाचे रंग उडाले; प्रशासनाच्या धास्तीने व्यावसायिक सजग


गुळाला आकर्षक चकाकी आणि पिवळाधम्मक रंग आणण्यासाठी रसायनांचा बेसुमार वापर करणार्‍या उत्पादकांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे व्यापारी आणि व्यावसायिक चांगलेच सजग झाले असून, बाजारातून रासायनिक रंगयुक्त गूळ पूर्णपणे गायब झाला आहे. सध्या बाजारपेठेत आकर्षक केशरी किंवा पिवळ्या गुळाऐवजी नैसर्गिक व रंगहीन गूळ विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे दिसत आहे.
आरोग्याविषयी वाढत्या जागरूकतेमुळे साखरेला उत्तम पर्याय म्हणून नागरिक गुळाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गूळ बनवताना वजन रंग आणि चकाकी वाढवण्यासाठी साखर, धुण्याचा सोडा, सोडियम हायड्रोसल्फाईट आणि सल्फर डायऑक्साईड यांसारख्या घातक रसायनांची भेसळ केली जात असल्याचे तपासात उघड झाले होते. अशा भेसळयुक्त गुळाच्या सेवनाने पचनाचे विकार, विषबाधा आणि इतर गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो.
कारवाईच्या भीतीने आणि ग्राहकांमधील वाढत्या जागरूकतेमुळे व्यापार्‍यांनीही आता रसायनमुक्त व सेंद्रिय (ऑर्गेनिक) गुळाच्या विक्रीवर भर दिला आहे. गोड पदार्थांना रंग आणण्यासाठी पूर्वी वापरला जाणारा पिवळा आणि केशरी गूळ आता दुकानांमधून हटवण्यात आला आहे. ग्राहकांनीही गुळाच्या बाह्य रंगाला न भुलता शुद्ध आणि नैसर्गिक गुळाची निवड करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button