
जैतापूरच्या ‘मिनी डेपो’साठी ग्रामपंचायतीचा पुन्हा आग्रहदहा वर्षांपासून पाठपुरावा; तीन गुंठे जागा एसटी महामंडळाला देऊनही कार्यवाही रखडली. विभागीय अभियंता बालाजी कांबळे यांना निवेदन; आमदार किरण सामंत यांच्या कार्यालयातही प्रत सादर
राजापू : रेवस-रेड्डी सागरी महामार्ग क्रमांक चारवरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या जैतापूर येथे एसटी महामंडळाचा किमान ‘मिनी डेपो’ सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी जैतापूर ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून या मागणीसाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून, वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जैतापूर येथे मिनी डेपो उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाला तीन गुंठे जागा दिली आहे. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच प्रस्तावित जागेवर वृक्षारोपणही करण्यात आले होते. त्यामुळे या जागेवर लवकरच मिनी डेपोची उभारणी सुरू होईल, अशी अपेक्षा जैतापूरवासीयांना होती. मात्र, अद्यापही या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही.
मिनी डेपोच्या मागणीसाठी तत्कालीन पालकमंत्री अॅड. अनिल परब, माजी आमदार डॉ. राजन साळवी, मुंबईस्थित असूनही जैतापूर पंचक्रोशीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख संदीप शिवलकर, सामाजिक कार्यकर्ते आशिष मांजरेकर, माजी सरपंच शैलजा मांजरेकर, माजी सरपंच रेखा कोंडेकर तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी विविध स्तरांवर निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित जागेची अनेकदा पाहणी केली आहे. त्यामुळे मिनी डेपोच्या उभारणीबाबत जैतापूरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पाहणी आणि आश्वासनांपलीकडे अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर जैतापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी एसटी महामंडळाचे रत्नागिरी विभागीय अभियंता बालाजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी जैतापूर येथे मिनी डेपो सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या निवेदनाची प्रत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांच्या रत्नागिरी येथील कार्यालयातही सादर करण्यात आली आहे.
जैतापूर हे सागरी महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून, परिसरातील अनेक गावांसाठी एसटी वाहतूक हा सार्वजनिक वाहतुकीचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे जैतापूर येथे मिनी डेपो सुरू झाल्यास परिसरातील एसटी वाहतूक अधिक सक्षम होण्यासोबतच प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
दहा वर्षांचा पाठपुरावा, एसटी महामंडळाला देण्यात आलेली तीन गुंठे जागा आणि अधिकाऱ्यांकडून झालेल्या पाहण्या यानंतर आता तरी मिनी डेपोच्या प्रत्यक्ष उभारणीला मुहूर्त मिळावा, अशी अपेक्षा जैतापूरवासीय व्यक्त करीत आहेत. या मागणीच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थांचे लक्ष आता एसटी महामंडळाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.



