
चिपळूणचे सुपुत्र उद्योजक राजूसाहेब जोशी यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार’ जाहीर
चिपळूण : उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे चिपळूणचे सुपुत्र उद्योजक राजूसाहेब जोशी यांना इंडियन स्टुडन्ट कौन्सिलचा राज्यस्तरीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार-२०२६’ जाहीर झाला आहे. उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानासह सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राजूसाहेब जोशी हे माजी आमदार नाना जोशी यांचे सुपुत्र असून त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात सागर कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गीय निशिकांत नाना जोशी यांच्या स्मरणार्थ कामठी येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज वॉर्ड उभारण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. संकटकाळात नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.
शहरातील विविध लोकाभिमुख उपक्रमांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे. श्री देव जुना कालभैरव मंदिर परिसरात ‘सागर रंगमंच’ उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
उद्योग, सामाजिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील या योगदानाची दखल घेत इंडियन स्टुडन्ट कौन्सिलने राजूसाहेब जोशी यांची राज्यस्तरीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार-२०२६’ साठी निवड केली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.




