
आरोही पिलणकर हिची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
रत्नागिरी : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध वयोगटांतील जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राज्यस्तरीय स्पर्धेत आरोही अजित पिलणकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सर्व पाचही जलतरण प्रकारांत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. तिने ५० मीटर मुक्तशैली, १०० मीटर मुक्तशैली, ५० मीटर फुलपाखरू शैली, ५० मीटर पाठीवरून पोहणे आणि २०० मीटर वैयक्तिक मिश्रण या पाच प्रकारांत सहभाग घेतला आणि प्रत्येक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली.
आरोहीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर आणि पर्यवेक्षक अमर लवंदे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेमार्फतही आरोही अजित पीलणकर हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.




