महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल; रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा चटका, हवामान विभागाचा अंदाज!

Meteorological Department forecast : उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. यामुळे पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांत थंडीचा कडाका वाढू लागला आहे.

सध्या राज्यात दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री तसेच पहाटे थंडी, अशा दुहेरी आणि संमिश्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील हे चढ-उतार असेच कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण विभागात सध्या कमाल तापमानात वाढ होत असून ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान १६ ते १८ अंशांच्या आसपास राहील. तिथे दिवसा उष्ण आणि दमट वातावरण असले तरी रात्री थंड वारे व पहाटे गारवा जाणवत आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगावमध्ये कोरडे हवामान राहील. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान २८ ते ३० अंश आणि किमान तापमान १६ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. तापमानात घट असली तरी मोठा बदल अपेक्षित नाही.

पुणे शहर आणि जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान २८ ते २९ अंश, तर किमान १६ ते १८ अंशांच्या आसपास राहील. मराठवाड्यातही आकाश निरभ्र असून दिवसा उष्णता आणि रात्री थंडी आहे. या भागात कमाल तापमान २८ अंश आणि किमान १४ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता असून थंडी वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी सध्या कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार असून तापमानात फारसा बदल होणार नाही. २१ नोव्हेंबर रोजी येथे कमाल तापमान २८ अंश आणि किमान तापमान २१ अंशांच्या आसपास राहील, आणि पुढील चार ते पाच दिवस हीच स्थिती कायम राहील. दरम्यान, दिवसा ऊन आणि रात्री थंडी अशा बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button