प्रभाग १५ मधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकाऱ्यांकडून तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना


नगरसेविका वर्षा ढेकणे यांच्या निवेदनाची दखल संबंधित विभागाला काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश


  • रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रभाग क्रमांक १५ च्या भाजपा नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.

प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना देण्यात येत होत्या. मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते. मटेरियल उपलब्ध नसल्याचे कारणही वारंवार सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक ज्येष्ठ नागरिक महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

या निवेदनाची मुख्याधिकारी यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित प्रशासनाला प्रभाग क्रमांक १५ मधील रस्त्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक साहित्य उपलब्ध करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या.** नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासन सकारात्मक असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याची भूमिका यावेळी दिसून आली.

नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याबद्दल नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी मुख्याधिकारी व संबंधित प्रशासनाचे आभार मानले. तसेच प्रत्यक्ष काम लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button