
ग्रामीण भागात शासकीय लसीकरण हे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे : अॅड. सुयोग कांबळे
पाली : आयुष्यमान आरोग्य मंदिर खानू (ता. रत्नागिरी) येथे जन आरोग्य समितीची सभा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती तथा जन आरोग्य समिती खानुचे अध्यक्ष अॅड. सुयोग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यावेळी पंचायत समिती सदस्या डॉ. पद्मजा कांबळे, जन आरोग्य समिती सदस्य ॲड. सागर पाखरे, संजय गावडे, चरवेली सरपंच श्रीमती लेले, नाणीज ग्रामपंचायतीचे प्रशासक पी. एन. सुर्वे, खानूचे ग्रामपंचायत अधिकारी उमेश साळवी, आयसीडीएस पर्यवेक्षिका श्रीमती गीते, खानूच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा भायजे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जनसंवाद दौऱ्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच इतिवृत्त वाचन, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कामकाज आढावा, औषधसाठा व लस साठा उपलब्धता, आरोग्य विषयक मोहिमा आढावा, प्रयोगशाळा तपासणी, बांधकाम विषयक आढावा घेण्यात आला.
तसेच मुंबई-गोवा व मिऱऱ्य-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर सध्या अपघातांचे प्रमाण वाढलेले असल्याने शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र खानू हे याच महामार्गांवर नजीक असल्याने येथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अपघातग्रस्त रुग्णांना प्रथमोपचाराच्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी येथे २४ तास प्रथमोपचाराच्या सुविधा उपलब्ध असल्याचे आरोग्य केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.
त्याचबरोबर बालकांमध्ये होणाऱ्या न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे, न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखणे,प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करणे तसेच बाधित बालकांना वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्ह्यात ‘SAANS’ अभियान राबविणार असून त्याचाही आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर एचपीव्ही लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी शाळा महाविद्यालय यांच्याशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले.
आयुष्यमान आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व लसीकरणाच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छता, परिपत्रक वाचन व अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणारे विषय याबाबत सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.




