
दापोलीत थंडीचा कडाका; पारा ९.३ अंशांवर

दापोली, २१ : गेल्या काही दिवसांपासून दापोली परिसरात थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमानाने चक्क दहा अंशांची पातळी ओलांडली आहे. दापोलीत ९.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे.
विशेष म्हणजे, रात्रीच्या तापमानात मोठी घट होत असताना दिवसा मात्र उष्णता कायम आहे. दापोलीत कमाल ३१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
या बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. थंडीचा वाढता जोर आंबा मोहोरासाठी पोषक ठरण्याची शक्यता असल्याने बागायतदारांचे लक्ष हवामानाकडे लागले आहे.
दरम्यान, दिवसा उष्णता आणि रात्री कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी तापमानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.




