देवरुखचा सुपुत्र वैभव मांगले यांची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप!


रशियातील BRICS+ महोत्सवात भारतीय चित्रपटांचा गौरव; ‘हप्पन सांगवाला’ सर्वोत्कृष्ट लघुपट, ‘स्नो फ्लॉवर’ला विशेष पुरस्कार


अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे देवरुखचे सुपुत्र अभिनेते वैभव मांगले यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांना मोठा सन्मान मिळाला. यामध्ये वैभव मांगले यांची भूमिका असलेल्या ‘स्नो फ्लॉवर’ या भारत-रशिया सहनिर्मित चित्रपटाला विशेष महोत्सव पुरस्काराने गौरविण्यात आले.

या महोत्सवात रवी यादव निर्मित ‘हप्पन सांगवाला’ या भारतीय लघुपटाने सर्वोत्कृष्ट काल्पनिक लघुपटाचा पुरस्कार पटकावला. लोप पावत चाललेल्या पारंपरिक ‘स्वांग’ लोककलेवर आणि या कलेच्या जतनासाठी आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ कलाकार हप्पन सांग यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. भारतीय लोकपरंपरेतील समृद्ध कलाविश्व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम या चित्रपटाने केले आहे.

दरम्यान, ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटातील अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेते वैभव मांगले यांच्या अभिनयाचीही विशेष दखल घेण्यात आली. कोकणातून आंतरराष्ट्रीय चित्रपटविश्वापर्यंत पोहोचलेल्या या कलाकृतीच्या यशाबद्दल छाया कदम यांनी आनंद व्यक्त केला. मिळालेला सन्मान हा संपूर्ण चित्रपटाच्या टीमचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वैभव मांगले यांनीही पुरस्काराचे श्रेय संपूर्ण टीमला दिले.

या महोत्सवासाठी जगभरातील २२ देशांमधून ३२७ चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १५ हून अधिक देशांतील ६० पेक्षा जास्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. महोत्सवात एकूण १२ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांस्कृतिक संबंध क्षेत्रातील तज्ज्ञ जयिता घोष यांनी सांभाळली.

रशिया, भारत, इराण, क्युबा, ब्राझील, व्हिएतनाम आणि बेलारूस यांसह विविध देशांतील चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. भारतीय चित्रपटांना मिळालेला हा सन्मान देशातील लोककला, संस्कृती आणि चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावाची जाणीव करून देणारा ठरला आहे.

विशेषतः देवरुखसारख्या कोकणातील भूमीतून पुढे आलेल्या वैभव मांगले यांच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button