
‘जिल्हास्तर युवा महोत्सव २०२६-२७’ उत्साहात; ‘मन, मनगट आणि मेंदूच्या विकासासाठी कलागुणांना व्यासपीठ आवश्यक’ – प्रशांत सातपुते
रत्नागिरी, दि. २० ): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते आज झाले. “’नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत…!’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात तरुणांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने समूह लोकनृत्य, समूह लोकगीत आणि कविता लेखन आदी कला प्रकारांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, युवा भारतचे सम्राट पाटील, प्रमुख पाहुणे मिलिंद विरकर आणि प्रशासनातील इतर अधिकारी व स्पर्धेचे पंच उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले युवा स्पर्धक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित युवा स्पर्धकांना मार्गदर्शन करताना जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, “क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धांसोबतच तरुणांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारताची संस्कृती, भाषा आणि पेहरावात विविधता असली तरी ‘विविधतेत एकता’ हेच आपले खरे सामर्थ्य आहे, वैशिष्ट्यं आहे. आपल्या कोकणालाही समृद्ध पारंपरिक वारसा लाभला असून, येथील कलागुणांना संधी देणारे हे एक हक्काचे व्यासपीठ आहे.”
“पंतप्रधानांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले गाव पूर्वी कसे होते, आज कसे आहे आणि २०४७ मध्ये आपला जिल्हा, महाराष्ट्र व भारत कसा असेल, याचा विचार तरुणांनी आपल्या कलाकृतींमधून मांडावा. अशा उपक्रमांमधून तरुणांचे मन, मनगट आणि मेंदू यांचा सर्वांगीण विकास होतो, जी आजच्या काळाची खरी गरज आहे.”
तरुणांनी आपल्या सभोवतालच्या परिसरातील आणि गावखेड्यातील प्रश्नांवर व भविष्यातील संकल्पनांवर विचार करायला लावणाऱ्या दर्जेदार कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन करत सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी युवा महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली.
युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन — जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय अशा चार स्तरांवर युवा महोत्सव साजरा केला जातो. युवकांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले.
यंदाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, चित्रकला आणि कविता लेखन यांसारख्या विविध कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यंदा ‘विकसित भारत’ या संकल्पनेची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत गेल्या महिनाभरापासून राबविण्यात आलेल्या ‘चॅलेंज ट्रॅक’मधून (चॅलेंज रॅली/ट्रॅक) निवड झालेल्या सुमारे २६ खेळाडूंचे सादरीकरणही या महोत्सवात पीपीटीच्या (PPT) माध्यमातून होणार आहे
शेवटी सम्राट पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.




