भेसळयुक्त दारु प्यायल्याने १५ जणांचा मृत्यू, तर १८० जणांवर उपचार सुरू, मणिपूरमध्ये मोठी खळबळ!


मणिपूरमध्ये भेसळयुक्त दारू प्यायल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच तब्बल १८० जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात मागच्या ४८ तासांत संशयास्पद भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हेल्थ ॲडव्हायझरी जारी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

चंदेलच्या पोलीस अधीक्षकांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात आधी ८ जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली होती. पोलिसांच्या निवेदनानुसार, काही पीडितांचा मृत्यू त्यांच्या घरीच झाला, तर काहींचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर झाला. १८ ते २० नोव्हेंबर या दरम्यान हे मृत्यू झाले आहेत.

चंदेल जिल्हा पोलिसांनी सांगितलं की, मृतांनी प्यायलेली दारू काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथून आणलेली होती. ही भेसळयुक्त दारू असल्याचा संशय असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी असंही नमूद केलं की, नोंदवलेल्या मृत्यूंपैकी पाच मृत्यू सुग्नू पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतात. पोलिसांनी जनतेला आणि आवाहन केलं आहे की या घटनेबाबत कोणत्याही अफवा किंवा माहिती प्रसारित करू नये किंवा कोणताही वेगळा निष्कर्ष काढू नये.

जिल्हा प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना जारी

चंडेलच्या उपायुक्तांनी गुरुवारी काही आरोग्यविषयक सूचना जारी केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप वैद्यकीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या या मृत्यूंच्या नेमक्या कारणांची निश्चिती केलेली नाही. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत संशयास्पद स्रोतांची मद्य विशेषतः बाधित भागातील संशयित स्रोतांकडून खरेदी केलेल्या पेयांचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, मद्यपान केल्यानंतर उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणं, अंधुक दिसणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं या सारखी लक्षणं आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button