
वाकेड घाटात भीषण दुर्घटना! दरड कोसळून पेट्रोल पंपावरील केबिन गाडली; अनोळखी वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पेट्रोल पंपावरील केबिन मातीखाली गाडली गेली. या दुर्घटनेत केबिनमध्ये आश्रय घेतलेल्या ५० ते ५५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलैच्या रात्री मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी सदर अनोळखी व्यक्ती पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये थांबली होती. त्याचवेळी अचानक दरड कोसळून मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा केबिनवर आला. त्यामुळे केबिन पूर्णपणे मातीखाली दबली गेली आणि त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाकेडचे पोलीस पाटील जयवंत भिकाजी जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून त्यांचा बांधा सडपातळ, रंग सावळा आणि दाढी वाढलेली व पिकलेली आहे. अद्याप त्यांची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ अन्वये लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मुसळधार पावसामुळे डोंगरकडील भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी आणि महामार्गावरील प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे




