
चिपळूण शहरातील खंड गणपती मंदिराजवळील महिलेचा विषारी पदार्थ सेवनानंतर मृत्यू
चिपळूण शहरातील खंड गणपती मंदिराजवळ राहणार्या वृषाली जगनाथ दैवज्ञ (वय ३०, सध्या रा. खंड गणपती मंदिराजवळ, मूळ सोमेश्वर, रत्नागिरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी गोळ्यांची पावडर व हिरव्या पेस्टसारखे काहीतरी सेवन केल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना प्रथम चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र अधिक उपचारांची गरज असल्याने डॉक्टरांनी त्यांना दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना डेरवण येथील वालावलंकर हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दि. १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४.५० वाजता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची दि. १६ रोजी चिपळूण पोलिसांत नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.




