जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १६.८० लाखांची ऑनलाइन फसवणूक


जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत दापोली तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जानराव राणे (वय ५९, रा. पांगारवाडी, ता. दापोली) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. १५ मार्च ते २१ मे २०२६ या कालावधीत साहिल कुमार आणि विशाल सिंह (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता.

संशयितांनी जुन्या दुर्मिळ नाण्यांच्या विक्रीतून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत विविध प्रक्रिया शुल्क, कमिशन, कर व इतर कारणे सांगून वेळोवेळी ऑनलाइन रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून राणे यांनी एकूण १६ लाख ८० हजार २५० रुपये विविध खात्यांवर ऑनलाइन पाठविले.

मात्र, वारंवार पैसे भरूनही कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही किंवा भरलेली रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राणे यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या आकर्षक आर्थिक आमिषांना बळी न पडता कोणतीही रक्कम पाठविण्यापूर्वी संबंधित व्यवहाराची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button